प्रत्येकाचे ताट विषमुक्त झाल्यास माझ्या कार्याचे चीज : राहिबाई पोपेरे   

सह्याद्री देवराई, भारती विद्यापीठातर्फे जीवन गौरव

पुणे : माझ्या कार्यामुळे प्रत्येकाचे ताट विषमुक्त झाल्यास कार्याचे चीज होईल, असे उद्गार राहिबाई पोपेरे यांनी काढले.सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले बीज संमेलन विद्यापीठात झाले. अनेक प्रकारच्या बियांचे देशी वाण जपण्यासाठी आपले आयुष्य वेचणार्‍या ‘बीजमाता’ राहिबाई पोपेरे यांना संमेलनात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. एक लाख रुपये व सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांतून भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांची या वेळी बीजतुला करून व सन्मानपत्र देऊन शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. 
 
भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आमदार डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्षा स्वप्नाली कदम, भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम, सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, उपाध्यक्ष अरविंद जगताप, हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, उपवन संरक्षक महादेव मोहिते मंचावर होते. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम फाऊंडेशनच्या माध्यमातून सह्याद्री देवराईच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असेल.आचार्य मुकुल शिवपुत्र यांनी राहिबाई पोपेरे यांच्या कार्याचे कौतुक करून सावा भाताचे बीज भेट दिले.अरविंद जगताप यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तेजस्वीनी बाबर यांनी आभार मानले.

Related Articles